Lifestyle Offbeat Poetry

लक्ष्मी..

आज माजघर शांत आहे
सुन्न बसलंय स्वयंपाकघर,
चुलीची धग लागत नाहीये
कारण चवताळलाय ज्वाळांचा वावर..

आज बांगड्या नाहीत किणकिणणाऱ्या
ना दिसला साडीचा पदर,
कपाळावरलं कुंकूही दिसेना
अन् एकाकी राहिला मंगळसूत्राचा सर..

असाच गेला दिवस
ओशाळली दुपार,
भरीस भर म्हणून
आली तिन्हीसांज..

पेटला नाही दिवा
तुळशीवृंदावन रितं,
देवही बसले अंधारात
देवघरही झालं परकं..

सरली संध्याकाळ
उगवली पुनवचांदणी,
घर मात्र तरीही उदास
कारण परलोकी गेली घरची लक्ष्मी !

Leave a Reply